प्रकाश रचना (light arrangements) हा तसा खूप सोपा, परंतु तितकाच क्लिष्ट विषय आहे. फोटोग्राफी मधील सर्वात महत्त्वाचे घटक म्हणजे प्रकाश. फोटोग्राफी शब्दातच प्रकाशाचे महत्व दिसून येईल (फोटो = प्रकाश; ग्राफी = चित्रण). पण ज्यावेळेला आपण प्रत्यक्ष फोतोग्राफी करू लागतो त्यावेळी आपण प्रकाश रचना ह्या मुलभूत घटकाला सपशेल विसरतो किंवा फाटा देतो. स्टुडिओ, वेडिंग फोटोग्राफी साठी उपयुक्त अशा प्रकाश रचने बद्दल आज आपण ह्या लेखा द्वारे समजून घेऊ.
1. FLAT LIGHTING
काय?
सामान्यतः वेडिंग फोटोग्राफर्स मध्ये प्रचलित असलेली प्रकाश रचना, ह्या मध्ये मुख्य लाईट (key light) हि डायरेक्ट लेन्स च्या दिशेने सब्जेक्ट वर रोखलेली असते. ह्यामुळे सब्जेक्ट हायलाईट होतो, पण सब्जेक्ट च्या चेहऱ्यावरील छटांच्या अभावामुळे छायाचित्रे निर्विकार वाटतात.

कशी?
हि रचना करत असताना key लाईट सब्जेक्ट च्या समोर, तुम्ही ज्या दिशेने शूट करत आहात, त्याच दिशेने ठेवा. लाईट ची दिशा हि चेहऱ्याच्या अगदी समोर, नाकापासून जराशी वर असेल, खाली किंवा बाजूला नसेल ह्याची दक्षता घ्या. ह्या रचनेमुळे चेहऱ्यावरच्या सुरकुत्या, पिंपल इत्यादी लपवता येतात.
कुठे?
- ज्या ठिकाणी चेहऱ्यावरील भाव दुय्यम असतील, परंतु चेहरे सुस्पष्ट दिसावे अशा ठिकाणी; उदाहरणार्थ पासपोर्ट फोटो, लग्नातील स्टेज वरचे फोटो
- Glamour फोटोग्राफी जेथे वय, अनावश्यक डीटेल्स लपवावे लागतात.
BUTTERFLY LIGHTING
काय?
Butterfly Lighting (किंवा Paramount Lighting) जुन्या हॉलीवूड चित्रपटांमध्ये प्रसिद्ध असलेली लायटिंग. ज्यात चेहऱ्याच्या वरील बाजूने प्रकाश स्रोत ठेवलेला असतो, जेणेकरून चेहऱ्या वरील भाव अधिक स्पष्ट दिसावेत.

कशी?
Flat लाईट रचने प्रमाणेच key लाईट ठेवून त्या लाईटला इतपत वर सेट करा कि नाकाखाली फुलपाखरा सारखी सावली दिसेल. Flat लाईट आणि Butterfly लाईट मध्ये फरक इतकाच कि key लाईटची उंची आणि angle येथे बदलतो. ह्या लाईटच्या इफेक्ट मुळे चेहरा तरुण दिसतोच पण चेहऱ्यावरील भाव अधिक उठून दिसतात.
कुठे?
ह्या रचनेचा वापर मुख्यतः Beauty shots घेण्याकरिता होतो. जर चेहऱ्याखाली रिफ्लेक्टर ठेवल्यास नाका खालची सावली soft होऊन प्रकाश आणि छायेचा अतिरिक्त contrast टाळला जाऊ शकतो.
LOOP LIGHTING
काय?
Loop लाईट हि सर्वात कॉमन रचना आहे. Butterfly लाईट रचनेचं हे advanced स्वरूप! ह्यात प्रकाश आणि सावल्यांचा नाट्यमय वापर केला जातो.

कशी?
Butterfly लाईटच्या उंचीवरच लाईट ठेवून लाईटची दिशा केवळ नाकाच्या समोर न ठेवता, डाव्या किंवा उजव्या बाजूला २५ ते ५० अंशाच्या कोनावर ठेवावे.
कुठे?
एका विशिष्ट कोनात लाईट ठेवल्याने प्रकाश आणि सावल्यांचा नाट्यमय pattern तयार होतो. सब्जेक्टच्या एका बाजूने अधिक प्रकाश असलेल्या ह्या रचनेचा वापर आपण पोर्टफ़ोलिओ शूट मध्ये करून चेहऱ्याच्या दुसऱ्या बाजूचे अनावश्यक डीटेल्स लपवू शकतो.
REMBRANDT LIGHTING
काय?
जगप्रसिद्ध डच चित्रकार रेम्बरांट आपली चित्रे काढताना नेहमी ह्याच रचनेचा वापर करत, त्याने प्रेरित अनेक चित्रकार, आणि नंतर छायाचित्रकार देखील ह्याच प्रकाश रचनेचा वापर आपल्या कलाकृतीत करू लागलेत. ह्या रचनेमुळे चेहऱ्याच्या एकाच भागावर प्रकाश पडून दुसऱ्या बाजूच्या डोळ्याखाली गालावर त्रिकोणी आकाराचा प्रकाशाचा patch तयार होऊन सब्जेक्टचं सौंदर्य अधिकच खुलतं.

कशी?
लूप रचने प्रमाणे लाईट adjust करत एका अशा विशिष्ट कोणापर्यंत फोकस आणा कि जेणेकरून सब्जेक्टच्या नाकाची सावली हि चेहऱ्याच्या सावलीला स्पर्श करेल. हि रचना चेहऱ्याला एका बाजूला प्रकाशात आणि दुसऱ्या बाजूला सावलीत ठेवते पण सावली असूनही चेहऱ्यावर प्रकाशाचा एक त्रिकोण तयार होतो.
कुठे?
हि रचना loop पेक्षा अधिक ठळक आणि नाट्यमय आहे. प्रकाश आणि सावलीची तीव्रता कमी अधिक करून आपण ह्या रचनेला अधिक इफेक्टीव्हली वापरू शकतो. सर्व प्रकारच्या पोर्ट्रेट, विशेषतः खेळाडूंच्या black and white पोर्ट्रेट मध्ये ह्या प्रकाश रचनेचा वापर करता येऊ शकतो. ह्या रचनेमुळे सब्जेक्ट अधिक slim दिसू लागतो.
SPLIT LIGHTING
काय?
नावाप्रमाणेच हि प्रकाश रचना हि सब्जेक्ट च्या चेहऱ्याला दुभागते. चेहऱ्याच्या एका भागावर प्रकाश आणि दुसऱ्यावर सावली अशी ह्या लाईटची रचना असते. Rembrandt lighting प्रमाणे सावली असलेल्या भागावर अजिबात प्रकाश पडत नाही.

कशी?
ह्या रचनेमध्ये चेहऱ्याच्या कुठल्याही एका बाजूला ९० अंशावर लाईट रोखायची असते. प्रकाश आणि छायेला दुभाजणारी रेषा हि चेहऱ्याच्या मध्यावर नाकावरून जावी. हि रचना अति नाट्यमय मानली जाते.
कुठे?
Flat lighting च्या विपरीत ह्या रचनेमध्ये सब्जेक्ट च्या चेहऱ्यावरील सुरकुत्या ठळकपणे उठून दिसतात. चेहऱ्यावरील बारीकसारीक डीटेल्स देखील ठळक होतात. ह्या प्रकाश रचनेचा वापर प्रामुख्याने मुलाखती, documentary, खेळाडूंच्या पिळदार शरीरयष्टीला अधिक प्रभावीपणे दाखविण्यासाठी करतात.
वर नमूद केलेल्या सर्वच रचनांमध्ये एकाच मुख्य लाईटचा वापर केला गेला असला तरी देखील आपण आपल्या सोई आणि आवडी नुसार दुसरी किंवा तिसरी लाईट वापरून अधिक प्रभावी छायाचित्रे घेऊ शकता. शिवाय ह्या रचना तुम्ही तुमच्या रुचीप्रमाणे थोड्या फार बदलू देखील शकता.
सध्या बाजारात वरील प्रकाश रचनेस पूरक अशा अनेक लाईट्स उपलब्ध आहेत. आपल्या आवश्यकते, रुची, आणि बजेट प्रमाणे तुम्ही त्या निवडू शकता.

अधिक माहिती करिता संपर्क: शार्प इमेजिंग, अहमदनगर ९४०४९८०१३३
© सर्व हक्क शार्प इमेजिंग, अहमदनगर कडे राखीव.
Can you please suggest any God Oxford tilekar flash for my Canon 5d mark 3 with the price
Godox TT685 would be a great option. Call 9404980133 for more details.
Nice
आपण दिलेली माहिती समजली पण जर ती चित्रांद्वारे सांगितले असते तर खूपच छान..