fbpx

लग्नाआधीच्या ‘शूट’गोष्टी Leave a comment

लाल रंगाचा घेरेदार ड्रेस घालून हिरव्यागार गवतातून आपल्याच नादात बागडत प्रेमाचा इजहार करणारी नायिका पडद्यावर बघत असताना आपल्या बाबतीतही हे घडायला हवं, असा विचार मनात डोकावून गेला नाही, अशी एकही तरुणी सापडायची नाही किंवा तिला आपल्या कवेत घेऊन हळुवार सुरावटीवर आँखो आँखो मैं प्यार-इश्कवाली बाते करत असंच एकमेकांत हरवून जावं असं वाटलं नाही म्हणणारा तरुण सापडणार नाही. एके काळी केवळ स्वप्नवत वाटणारी ही गोष्ट प्रत्येकाच्या बाबतीत आणि तेही शुभमंगल सावधान’ व्हायच्या आधी घडते आहे. प्री-वेडिंग’ ही संकल्पना तरुणाईच्या गळी उतरवणाऱ्या किमयागारांनी ही वेगळीच फिल्मी दुनिया त्यांच्यासाठी वास्तवात उतरवली आहे. लग्नाआधी असे रोमँटिक अल्बम करून देताना नेमक्या काय गमतीजमती वेडिंग फोटोग्राफर नामक जादूगाराला कराव्या लागतात याची चंमतग खुद्द त्यांनीच उलगडून सांगितली आहे.

‘प्री-वेडिंग फोटोग्राफी’ हा शब्द सध्या परवलीचा झाला आहे. फेसबुक-इन्स्टाग्रामवरून हे रोमँटिक अल्बम पाहताना जसा आनंद होतो तसेच प्रश्नही पडतात. आपल्यासारखीच सर्वसामान्य वाटणारी ही जोडपी.. मात्र तिच्यावर फु लांचा वर्षांव काय होतो, तिच्या साडीचा पदर ‘दिलवाले’मधल्या काजोलच्या साडीप्रमाणेच लांब हवेत उडत असतो. आपल्याला हे सगळं नवलाईचं वाटत असलं तरी हे प्रत्यक्षात आणताना वेडिंग फोटोग्राफर्स आणि त्यांच्या टीमला अजब कसरती कराव्या लागतात.

लग्नाचं चित्रीकरण करण्यापेक्षाही लग्नाआधी असे हटके अल्बम करण्याची इच्छा अनेक जोडपी व्यक्त करतात, कारण लग्नाचे विधी सुरू असताना किंवा त्या दिवशी प्री-वेडिंग शूटसाठी तयारी करणंच शक्य नसतं, असं वेडिंग फोटोग्राफर सरीन चवरकर याने सांगितलं. प्री-वेडिंग शूटसाठी ही जोडपी खास सुट्टी घेतात. हे शूट करण्यासाठी आम्हाला साधारणत: एक ते दोन दिवस लागतात. खरं म्हणजे प्री-वेडिंग शूट करण्याआधी आम्ही त्यांना काही कल्पना ऐकवतो. त्यांच्या मनात काही गोष्टी असतील तर ते आम्हाला सांगतात. वास्तविक प्रत्येक जोडपं हे फिल्म किंवा एखाद्या गाण्यानेच प्रभावित झालेले असतात. त्यामुळे फोटोत फिल्मीपणा आणावाच लागतो. त्या हिशोबाने त्या जोडप्याने तसे हावभाव देणं गरजेचं असतं, असं म्हणतो. फोटोपेक्षाही व्हिडीओत हे क्षण कै द करणं अनेक जोडप्यांना आवडतं. हे अल्बम्स करताना जोडप्यांना नेमकं कोणतं गाणं, चित्रीकरण, ड्रेसेस काय हवेत याबद्दलच्या कल्पना ऐकताना फोटोग्राफर्सची दमछाक होत नसेल तरच नवल! ‘अगदी हुबेहूब अमुक एका गाण्यातल्या व्हिडीओप्रमाणे त्यात दाखवलेल्या गोष्टी त्यांना हव्या असतात,’ असं वेडिंग फोटोग्राफर मितेश देधिया याने सांगितलं. बॉलीवूडपट आणि त्यांची गाणी आवडणारी जशी जोडपी आहेत तसंच अनेकांना हॉलीवूड चित्रपटातून ज्या पद्धतीने लग्नाचा सोहळा साजरा होतो त्या पद्धतीने किंवा डेस्टिनेशन वेडिंगचे परदेशातील व्हिडीओ पाहून त्या पद्धतीने शूट करण्याची इच्छा व्यक्त करतात, अशी माहिती वेडिंग फोटोग्राफर तृशांत तेली याने दिली.

खरं तर प्री-वेडिंग शूट हे सध्याचं वेड आहे, त्यामुळे ते करताना अनेक गमतीदार किस्से घडतात. शूटिंगचं लोकेशन कुठलं इथपासून ते त्यासाठी कपडे जमवणं, मेकअप-हेअर ड्रेसिंग ही आधीची तयारी. त्यानंतर त्यांच्याकडून पोजेस मिळवणं, चेहऱ्यावर त्यांना हव्या त्या गाण्यानुसार हावभाव मिळवणं यासाठी बराच तामझाम करावा लागतो. या शूटसाठी येणाऱ्या जोडप्यांचं एक तर नुकतंच लग्न ठरलेलं असतं. अनेकदा कांदेपोहेवालं लग्न असेल तर ते एकमेकांना नवीन असतात. त्यामुळे त्या दोघांमधला अवघडलेपणा घालवून त्यांना एकत्र पोज देण्यासाठी खूप विनवण्या कराव्या लागतात. बरं लव्ह मॅरेज असलं तरी त्यांच्याकडून प्रेमाचे ते हावभाव मिळतातच असं नाही. दोघांपैकी कोणी तरी एक फार लाजऱ्या स्वभावाचा असेल तर पोज देण्यासाठीही त्यांना विनवण्या कराव्या लागतात, असं तृषांत म्हणतो. कित्येकदा याच्या अगदी उलट अनुभवही येतात. एखादं जोडपं खूप उत्साही असतं तेव्हा आमच्याकडून अगदी हजार ते अडीच हजार फोटो काढून घेतात, त्यासाठी वेळ देतात. त्यांची प्रत्येक पोज वेगळीच असावी लागते, नाही तर मग त्यात वेगळेपणा दिसत नाही आणि ते जास्त आव्हानात्मक काम असतं. त्यासाठी भरपूर टेक घ्यावे लागतात, कारण प्रत्येक प्री-वेडिंग शूटसाठी आलेल्या जोडप्यांची मागणी अफाट असते. एक तर अशा शूटसाठी दिवसभरात सकाळ किंवा संध्याकाळ या दोनच वेळा चांगल्या असतात. मग दोन-तीन तास नुसतं शूटिंग होतं आणि असे पुन्हा त्यांच्या गरजांनुसार दोन ते तीन दिवस शूट चालतं, असं सरीनने सांगितलं.

शूट करताना घडणारे किस्से हा आणखी एक अफलातून अनुभव असतो. एखादं जोडपं इतकं उत्साही असतं, की त्यांचं शूट करताना ना त्यांना आजूबाजूचं भान राहतं ना आम्हाला.. असं तृषांत म्हणतो. ‘‘एका शूटसाठी आम्ही तळ्यावर गेलो होतो. ते तळ्याकाठी उभे होते आणि लांबून शॉट घेताना कॅमेरा झूम केल्यानंतर त्या मुलीच्या पायाखाली साप असल्याचं मला दिसलं. त्यांच्या ते लक्षात आलं की नाही हे मला क ळेना आणि त्यांना विचारेपर्यंत दोघेही त्या तलावात पडले. त्यांचे सगळे कपडे खराब झाले. नंतर कपडय़ांच्या तयारीपासून परत तो शॉट घेईपर्यंत हास्याची कारंजी फुटत होती,’’ असं त्याने सांगितलं. तर या अल्बम्समधील काही ठरावीक पोज आणि जागांवर चित्रीकरण करतानाही अनेक धमाल अनुभव येतात, असं तो म्हणतो. कित्येकदा गाडीवर बसूनही शूट करावे लागते. मग तिथे कधीकधी मुलीचा गाऊन किंवा ड्रेस कुठे तरी अडकतो. मग परत ते सारवण्यापासूनची सगळी गंमत असते किंवा रंगीबेरंगी फुलांच्या पाकळ्यांचा हवेतून त्यांच्यावर वर्षांव करायचा असतो तेव्हा बऱ्याचदा या पाकळ्या चेहऱ्यावर पडताना त्यांचे डोळे मिटतात. मग ते फार कृत्रिम वाटतं. त्यांचे हावभाव दिसत नाहीत. अनेकदा त्यासाठी फॅन लावून तसा वाऱ्याचा झोत त्यांच्यावरून फिरवावा लागतो. कधीकधी पाण्यात पाय घालून बसलेले असताना तो तिच्यावर पाणी उडवतोय असा एक शॉट असतो. तेव्हा स्विमिंग पुलवर बसूनच ते शूट करावं लागतं, कारण अनेकदा समुद्र किंवा नदीकाठी बसणं सहज शक्य नसतं आणि समजा, बसलो तरी पाण्यात छोटय़ा छोटय़ा माशांपासून, खेकडे वगैरे काही ना काही असतंच. असे प्राणी आले की चित्रीकरणात भलतीच गंमत उडते. त्यामुळे स्विमिंग पूलवरचं चित्रीकरण हा सगळ्यात सुरक्षित मार्ग असतो, असं तृषांत सांगतो.

प्री-वेडिंग शूट करून फोटो, व्हिडीओ किंवा सीरिज अगदी सहजपणे केल्या जातात. लग्नाआधीच्या अल्बमची तयारी युद्धपातळीवर केली जाते. हे अल्बम्स मग सोशल मीडियावर शेअर केले जातात. प्री-वेडिंग, प्री-प्रेग्नन्सी, फॅमिली शूट असे हे हळवे, महत्त्वाचे क्षण चित्रित करणाऱ्या वेगवेगळ्या संकल्पना दिवसेंदिवस लोकप्रिय होत चालल्या आहेत. मात्र हे शूट करताना आपल्याकडे चांगल्या कल्पनांचे तसे वावडे आहे. त्यामुळे अनेकदा फिल्मी प्रभावातूनच जोडपी येतात आणि त्यांना त्याच पद्धतीने अल्बम्स करून दिले जातात. त्यांची कितीही इच्छा असली तरी चित्रपटातील नायक-नायिकांप्रमाणे हुबेहूब या जोडप्यांचे प्रेमभरे क्षण कॅमेऱ्यात कैद करणं हे अनेक युक्त्याप्रयुक्त्या लढवून आणि तंत्राचा आधार घेऊनही सोपे झालेले नाही. त्यामुळे प्री-वेडिंग शूट हे एकाच वेळी मजेदार, तर त्याच वेळी कसोटी पाहणारे आणि त्यामुळेच आव्हानात्मक वाटतात, असे या क्षेत्रातील दिग्गज सांगतात.

आमचंही शूट

आम्ही खरं म्हणजे प्री-वेडिंग शूट करायचं असं ठरवलं, पण मग उगीच लग्नाचा खर्च असताना हा खर्च का वाढवायचा? असा विचार करत ते रद्द केलं. पुन्हा मग लग्न आयुष्यात एकदाच होतं. त्यामुळे त्याआधी अशा शूटची मजा आम्हालाही अनुभवायची होती म्हणून पुन्हा तयारी केली, असं आकांक्षा आणि स्वप्निल सांगतात. स्वप्निल आणि आकांक्षा प्रभू केदारी या दोघांचं लग्न म्हणजे मराठी आणि दाक्षिणात्य मिलाफ होता. त्यामुळे ही आंतरजातीय विवाहाची गंमत त्यांनी त्यांच्या प्री-वेडिंग शूटमध्येही अनुभवली.

फोटोग्राफर्स अशा शूटसाठी जागा सुचवतात. समुद्रकिनारा, विरार, वसईचा किल्ला अशी ठिकाणं या सगळ्या सोहळ्यासाठी प्रसिद्ध असली तरी आम्ही यासाठी लोणावळ्याला जायचं ठरवलं. एकदा हे शूट ठरल्यानंतर कपडय़ांचा प्रश्न महत्त्वाचा असतो. अनेक जण कपडे विकत किंवा भाडय़ाने घेतात. आम्हीही तेच पर्याय ठेवले, पण त्यातही जास्त खर्च होतो हे लक्षात आल्यावर आम्ही आमच्या परीने त्यावर तोडगा काढला, असं त्यांनी सांगितलं. ‘‘आम्ही सगळ्यात आधी घरातले न घातलेले आणि एकमेकांच्या कपडय़ांसोबत मॅच होतील असे कपडे निश्चित केले. मित्रांकडे त्यांनी न घातलेले, पण या शूटसाठी चांगले दिसतील असे कपडेदेखील शोधले आणि मग गरजेप्रमाणे काही कपडे विकत घेतले. आमचं लग्न ‘मराठी-दाक्षिणात्य सोहळा असल्याने पांढरी साडी आणि लुंगी घालूनही आम्ही शूट केलं,’’ असं सांगणाऱ्या आकांक्षा आणि स्वप्निलच्या मते प्री-वेडिंग शूट ही नुसतीच करमणूक नाही, तर लग्नाआधी एकमेकांना अजून जवळ येण्यासाठी आणि समजून घेण्यासाठी ते उपयोगी पडतं.

‘‘या एका दिवसासाठी आम्ही जवळजवळ महिनाभर तयारी करत होतो. कपडे, जागा, दागिने या सगळ्यांतून आम्हाला दोघांना नकळत एकमेकांच्या आवडीनिवडी, मूड कळत गेले. कपडय़ांच्या रंगीत तालमीसाठी लग्नाच्या आधी एकमेकांच्या घरी जात असल्याने सासरच्या घरचं दडपण आणि अवघडलेपणा आपसूकच दूर झाला,’’ असं आकांक्षा म्हणते. शूटदरम्यान स्वप्निलचे बाबा आमच्या सोबत होते आणि लोणावळ्याला आम्ही रस्त्यात थांबून एक तळ्यापाशी थांबून शूट करत असल्याने त्या गावातली माणसंदेखील तिथे होती.

हे सगळे आमच्याकडे बघत असताना सुरुवातीला थोडं अवघडल्यासारखं वाटतं होतं, पण मग जसजसा वेळ पुढे गेला तसे आम्ही त्या परिस्थितीत एकमेकांना सांभाळून घेत शूट एंजॉय केलं,’’ असं ती म्हणते. ‘‘लग्नात दोन्ही परिवारांच्या साक्षीने होणारे विधी, पूजा आणि फोटोचा कार्यक्रम सगळ्यांसाठी असतो, पण हे फोटोशूट फक्त आमच्यासाठी होतं जे लग्नाच्या आधीच नव्याने सुरू होणाऱ्या नात्याची चाहूल देऊन गेलं ज्याचा अर्थात आम्हाला फायदाच झाला. लग्नाचा अल्बम आम्ही म्हातारे झाल्यावर तर पाहूच, पण प्री-वेडिंगदरम्यानचे हे क्षण आठवणी बनून हा अल्बम बघताना नेहमी आमच्यासोबत राहतील.’’

अजब मागण्या..

काही वेळा या जोडप्यांच्या इच्छा इतक्या अजबगजब असतात. सगळीकडे पाऊस पडतो आहे, आकाशात विजा चमकतायेत.. अशा वातावरणात त्यांना शूट करून हवं असतं. आता ही कल्पना म्हणून चांगली असली तरी वास्तवात ते अजिबातच सोप्पं नसतं. त्यामुळे तेव्हा आम्हाला पावसाचं पाणी पडतंय वगैरे गोष्टी व्हीएफएक्सच्या माध्यमातून दाखवाव्या लागतात. आभासी चित्रण किंवा मिनिएचर फोटोग्राफीतून तसे इफेक्टस आम्ही देतो आणि मग असे प्रसंग कल्पनेने रंगवायचे तर चिक्कार टेक द्यावे लागतात, असं मितेशने सांगितलं.

शूटसाठी मांजर, कबुतर काहीही..

कबुतर किंवा मांजर हे प्रॉपर्टीचा भाग असू शकतात? चित्रपटात जसे असतात तसंच आमच्या शूटसाठीही या प्रॉप्स गरजेच्या असतात, असं मितेश म्हणतो. पाळीव मांजरांपासून ते हवेत उडणाऱ्या पक्ष्यांपर्यंत अनेकांचा जोडप्यांच्या पुढे किंवा बॅकग्राऊंडला आधार म्हणून त्यांचा वापर होतो. जोडप्याच्या पुढे पक्षी उडताना दाखवायचे असतील तर योग्य टायमिंग साधावं लागतं. तसं झालं नाही तर परत कधीच त्यांचा वापर ठरल्याप्रमाणे होत नाही. पक्षी उडावेत म्हणून त्यांना घाबरवलं जातं. ते उडणार तेव्हाच त्या जोडप्यांना त्यांच्या थोडं जवळ घेऊन जावं लागतं आणि मग शॉट घेतला जातो. कधीकधी शूटसाठी असे पक्षी खास आणले जातात. नाही तर सोपा मार्ग म्हणजे शहरात ज्या ठिकाणी कबूतरखाना असेल त्या ठिकाणी आम्ही शूट करतो, अशी माहिती त्याने दिली. शिवाय आऊ टडोअर शूटिंग करतो तेव्हा लायटिंगचीसुद्धा फार आवश्यकता असते. लायटिंगचे रिफलेक्शन आम्ही देतो, मात्र ते फार कृत्रिम न वाटता प्रकाशकिरण आपसूक पडले आहेत असे वाटावे म्हणून आम्ही गाडीच्या हेडलाइटचे दिवे वापरतो, अशी गंमतही मितेशने सांगितली.

कुठं कुठं जायाचं लोकेशनला

साधारण सगळे शूट हे प्रत्येक जोडप्यांशी बोलूनच ठरवले जातात, पण कधीकधी हवे तसे लोकेशन मिळाले तरी हव्या त्या पद्धतीने शूट होत नाही. लोकेशन हे आधीच बुक केलेले असतात. त्यामुळे असंच आम्ही एक लोकेशन बुक केलं होतं. आम्हाला शूटमध्ये उगवतीचा सूर्य हवा होता जो आम्हाला त्याच लोकेशनवर मिळणार होता. त्या हिशोबाने आम्ही त्या शूटसाठी त्या कपलला त्या विशिष्ट वेळी बोलावले, पण काही कारणास्तव त्यांना यायला उशीर झाला. तोवर तो सूर्यही गेला आणि ते लोकेशनवरचे शूटही हुकले. त्यामुळे असे काही शूट्स असतात त्या ठरावीक वेळेपुरतीच त्या त्या लोकेशनची गरज असते. अर्थात हे सगळं त्या जोडप्यांच्या कल्पनेनुसार शूट ठरलेलं असल्याने नियोजन महत्त्वाचं असतं, असं सरीनने सांगितलं.

साभार

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

SHOPPING CART

close