fbpx

खाजगी असे बरेच काही! Leave a comment

या भारतीय शहरी एकटेपणापेक्षाही ही चित्रे वेगळी आहेत. कारण त्यात फक्त उदास वातावरण नाही, तर त्याही पलीकडे विविध भाव आहेत.

पुलाची वैशिष्टय़पूर्ण रचना आणि त्या रचनेआड आपले काही खासगी क्षण व्यतीत करणारे एक जोडपे. त्यांचे केवळ पाय दिसताहेत आणि त्यांनी साधलेली जवळीक. दुसऱ्या एका छायाचित्रात खालच्या बाजूस कॅफे आणि त्याच्यावरच्या खोलीमध्ये एक जोडपे. त्यातील एक जण पहुडलेला, तर एक बसलेला. इथेही दिसतोय तो खासगी क्षणच. तिसऱ्या छायाचित्रामध्ये एक बंद काचेची खिडकी, पलीकडे पिवळ्या रंगछटेच्या प्रकाशामध्ये कदाचित एक व्यक्ती कपडे बदलते आहे, तर कुणी खिडकीत बसून विमनस्क अवस्थेमध्ये खाली झुकलेला.. खरे तर हे सारे खासगी क्षण आहेत, कुणाच्या तरी आयुष्यातले. एका वेगळ्या अर्थाने पाहायचे तर छायाचित्रकार कुणाच्या तरी आयुष्यात डोकावून पाहण्याचा प्रयत्न करतो आहे. प्रसिद्ध इटालियन छायाचित्रकार लिओनार्दो पुसी याची छायाचित्रे पाहताना हे व असे अनेक प्रश्न पडतात. लिओनार्दो म्हणतो की, हे क्षण तसे खासगी असले तरी ते कथनात्म आहेत. त्यात थिल्लरपणा किंवा अश्लीलता नाही. तो क्षण पाहिल्यानंतर रसिकाचा त्या क्षणांशी संवाद सुरू होता. त्यामुळे तो क्षण ज्या व्यक्तीचा आहे, त्या व्यक्तीचा तो राहात नाही. तिथूनच त्या क्षणाच्या कलात्मकतेला सुरुवात होते.

एक गोष्ट ही छायाचित्रे पाहताना प्रामुख्याने लक्षात येते ती म्हणजे हे खासगी क्षण लोकांच्या नकळत टिपलेले आहेत. दुसरे म्हणजे त्यात काही ठिकाणी शरीर किंवा शरीराचा एखादा भाग दिसत असला तरी त्यात उत्तानता किंवा भडकपणा येणार नाही, याची छायाचित्रकाराने काळजी घेतली आहे; किंबहुना ते टिपण्याच्या पद्धतीमध्येही कलात्मकताच अधिक दिसून येते. ही सर्व छायाचित्रे पहाटेची किंवा रात्र- मध्यरात्रीची आहेत. त्यामध्ये येणारा काळोख आणि प्रसंगी दिसणारे रंग नाटय़ात्म आहेत. पिवळसर प्रकाशात कपडे बदलणारी व्यक्ती त्या रंगामुळे काहीशी गूढ आणि कथनात्म कृती करणारी अशी वाटते. या छायाचित्रांमध्ये रंगदेखील एक वैशिष्टय़पूर्ण भूमिकाच निभावताना दिसतात. याशिवाय प्रत्येक छायाचित्रामधील चौकटीचे भानदेखील वाखाणण्याजोगे असेच आहे. एका छायाचित्रामध्ये टॉवेल गुंडाळून बसलेली एक व्यक्ती अर्धवट दिसते. दुसऱ्या एका व्यक्तीचा एक हात व पाय दिसतो. बाजूला भिंतीवर पोस्टर आहे- द मॅन हू नोज. हे छायाचित्र अतिशय बोलके आहे.

काही छायाचित्रांमध्ये चेहरे दिसतात, तर काहींमध्ये नाही; पण त्यांचे परिणाम एकसारखेच आहेत. एका छायाचित्रात हॉटेलच्या गॅलरीमध्ये उभे आणि एकमेकांकडे पाहाणारे दोन पुरुष दिसतात. तसेच दोन पुरुष ज्यांचे चेहरे दिसत नाहीत ते तरणतलावामध्ये पाण्यात सेल्फी टिपताहेत. यांच्यामध्ये नेमका काय बरे संवाद सुरू असेल, असा प्रश्न रसिकमनात नक्कीच येतो.. चित्रातले संपून रसिकाच्या मनातील संवाद हेच छायाचित्रकाराला अपेक्षित आहे.

ही सर्व छायाचित्रे आपण व्यवस्थित पाहिली तर असे लक्षात येते की, ती त्या खासगी क्षणांच्याही पलीकडे खूप काही सांगणारी आहेत. बहुतांश सर्व छायाचित्रे ही शहरामधील आहेत. त्यातील अनेक छायाचित्रांमधून जाणवतो तो शहरातील एकटेपणा! हा एकटेपणा शहरी झगमगाटातही काहीसा भकास वाटावा असा आहे. मुंबईसारख्या शहरामध्ये अशी दृश्ये आता तशी नेहमीची झाली आहेत. दक्षिण मुंबईच्या उड्डाणपुलांवरून किंवा मग अंधेरी- घाटकोपर मेट्रोमधून प्रवास करताना असे अनेक खासगी क्षण आपसूक नजरेस पडतात. काही ठिकाणी टीव्हीवर नजर खिळलेले भकास चेहरे, तर काही घरांमध्ये नित्यनैमित्तिक काही सुरू असलेले, तर अनेक वयस्कर सदासर्वकाळ खिडकीत किंवा गॅलरीत उभे; तोच शहरी भकासपणा घेऊन. त्यांच्या चेहऱ्यावरच्या सुरकुत्या आणि भिंतीवरच्या भेगा खूप काही सांगून जातात. या भारतीय शहरी एकटेपणापेक्षाही ही चित्रे वेगळी आहेत. कारण त्यात फक्त उदास वातावरण नाही, तर त्याही पलीकडे विविध भाव आहेत. विचार करता असे लक्षात येते की, विषयाला नेमका हात घालतानाच पुसीने रसिकाशी दृश्याने संवाद साधण्याचा त्याचा हेतू नेमका साध्य केला आहे. म्हणजे रसिकांची उत्सुकता चाळवण्यापुरता तो क्षण त्याने वापरला आहे. त्यापुढे सुरू होतो तो रसिकमनातील संवादच.. पुसी अलीकडेच भारतात येऊन गेला. त्याचे मत आहे की, इथे न बोलले जाणारे असे बरेच काही आहे. ते टिपता आले तर ते छायाचित्रकाराचे यश ठरावे. आता प्रतीक्षा आहे ती पुसीने टिपलेली भारतीय छायाचित्रे पाहण्याची!

साभार.

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

SHOPPING CART

close