fbpx

छायाचित्रणाची आश्वासक सुरुवात Leave a comment

स्मार्टफोनने इतर गॅझेटचे महत्त्व दुय्यम केले, तसेच कॅमेऱ्यांचेही केले. स्मार्टफोनच्या कॅमेऱ्यांचा दर्जा वाढू लागल्यानंतर स्मार्टफोनमधून छायाचित्रे काढण्यावर भर वाढत चालला आहे आणि ते साहजिकही आहे. प्रत्येक वेळी कॅमेरा आपल्या जवळ ठेवणे शक्य नसते. अशा वेळी स्मार्टफोनचा कॅमेरा ती भूमिका बजावतो. पण म्हणून कॅमेरे अस्तंगत होतील किंवा त्यांची गरज कमी होईल, अशी परिस्थिती नाही. याउलट एकीकडे फोन स्मार्ट बनून कॅमेऱ्यांचे काम करत असताना कॅमेरा बनवणाऱ्या कंपन्या ‘स्मार्ट’ कॅमेरे बनवण्यावर भर देऊ लागल्या आहेत. ‘कॅनन’ या आघाडीच्या कंपनीचा ‘ईओएस ३०००डी’ हा कॅमेरा या पंक्तीत दाखल झालेले नवीन उत्पादन आहे.

‘कॅनन ईओएस ३०००डी’ हा ‘डीएसएलआर’ कॅमेरा आहे. हा कॅमेरा वजनाने अतिशय हलका असल्याने हाताळण्यास किंवा सतत सोबत घेऊन वावरण्यास अगदी सोपा आहे. कॅमेऱ्याची पूर्ण ‘बॉडी’ प्लास्टिकने बनलेली आहे. कॅमेऱ्याचा उत्पादन खर्च आटोक्यात ठेवून त्याची किंमत कमी ठेवणे, हा यामागचा हेतू असल्याचे सहज लक्षात येते. त्यामुळे कॅमेऱ्याच्या मजबूतपणाशी काहीशी तडजोड करण्यात आली असली तरी प्लास्टिक बॉडीमुळे तो वजनाने हलका बनला आहे, ही बाब छायाचित्रणाच्या पथ्यावर पडणारी आहे.

कॅमेऱ्याच्या वरच्या बाजूला अनेक बटणे आपल्याला पाहायला मिळतात. त्यामध्ये ‘मोड डायल’वर वेगवेगळय़ा दृश्यसंगतीतील सेटिंग करण्यात आलेले ‘मोड’ आहेत. त्यामुळे दृश्य आणि प्रकाश यांनुसार आपल्याला ‘मोड’ निवडता येतो. कॅमेऱ्याच्या मागील बाजूस २.७ इंचांचा एलसीडी डिस्प्ले असून त्याबाजूलाच ‘डी पॅड’, ‘रेकॉर्डिग’ अशी बटणे आहेत. या बटणांच्या मदतीने छायाचित्रण करणे अतिशय सोपे झाले आहे.

या कॅमेऱ्यासोबत लेन्सही पुरवण्यात आली आहे. ही लेन्स दिसायला साधी असली तरी, योग्य ‘फोकस’ करण्यासाठी तसेच ‘झूम’ करण्यासाठी ती अतिशय उपयुक्त ठरते.

‘३००० डी’ हा मुख्यत्वे नवोदित छायाचित्रकारांसाठी किंवा हौशी छायाचित्रकारांसाठीचा कॅमेरा आहे. त्यामुळे त्यातील सर्व वैशिष्टय़े अगदी बटणांनिशी हाताळता येतात. यामध्ये ‘वायफाय’ सुविधा असून तुम्ही त्याच्या मदतीने काढलेली छायाचित्रे थेट स्मार्टफोनवर पाठवू शकता. सध्या समाजमाध्यमांवर शेअरिंग करण्याकडे वाढत असलेला ओढा पाहता ही सुविधा अतिशय महत्त्वाची आहे.

या कॅमेऱ्यात १८ मेगापिक्सेलचा एपीएस-सी सीएमओएस सेन्सर असून त्याला कॅननच्या डिजिक४+ इमेज प्रोसेसरची जोड लाभली आहे. तुम्ही या कॅमेऱ्याच्या मदतीने १०८०पी रेझोल्युशन क्षमतेचे व्हिडीओही चित्रित करू शकता. कॅमेऱ्यातून काढण्यात आलेली छायाचित्रे अतिशय उत्तम दर्जाची असून कमी प्रकाशात कॅमेरा योग्य प्रकाशसंगती निर्माण करून छायाचित्रांमध्ये उठाव आणतो. मात्र, छायाचित्रांमधील ‘शार्पनेस’ काही प्रमाणात कमी असल्याचेही आम्हाला आढळून आले. मात्र, यामुळे छायाचित्रणाचा दर्जा कमी होत नाही, हेही नमूद करायला हवे.

कॅमेऱ्याची ठळक वैशिष्टय़े

* आकार : १२ सेमी बाय १० सेमी बाय ७.७ सेमी

* वजन : अंदाजे ३८९ ग्रॅम

* इमेज सेन्सर : १८.० मेगापिक्सेल

* इमेज प्रोसेसर : डिजिक ४+

* कनेक्टिव्हीटी : वायफाय

* किंमत : ३१९९५ रुपये

सोर्स

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

SHOPPING CART

close