सध्या सर्वच फोटोग्राफर्सचं एक स्वप्न आहे की आपल्याकडे एक फुल फ्रेम कॅमेरा असावा. अनेकांचं ते स्वप्न पूर्णत्वास देखील आलं आहे. एका लेटेस्ट फुल फ्रेम कॅमेऱ्याचे मालक होण्यासाठी घेतली जाणारी यत्ने मी जवळून पाहिली आणि अनुभवली आहे. वर्षानुवर्षे आपल्या कष्टाचा पैसा साठवून हफ्त्यावर एक फुल फ्रेम कॅमेरा घेतला जातो, आणि पुढील वर्षभर त्याचे कर्ज फेडले जाते. इतका आटापिटा का? का लाखो रुपये खर्च केले जातात फुल फ्रेम कॅमेऱ्यासाठी? काय फरक आहे फुल फ्रेम आणि क्रॉप सेन्सर मध्ये?
पूर्वीच्या काळी जेव्हा फिल्म कॅमेरे वापरले जात त्यावेळी 35mm (36mm X 24mm) मापाची फिल्म ही जास्त प्रचलित होती, आणि न कळत तेच माप हे इंडस्ट्री स्टॅंडर्ड बनलं. नंतर डिजिटल कॅमेरे आले आणि बघता बघता फिल्म कॅमेरे कालबाह्य झालेत. काही दिवसांपूर्वीच Canon ने फिल्म कॅमेरा इंडस्ट्रीला अलविदा केला. पण डिजिटल कॅमेरे उत्क्रांत होताना 35mm स्टॅण्डर्ड साईज ला तिलांजली द्यावी लागली. कारण इतक्या मोठ्या साईजचे सेन्सर बनविणे तांत्रिक दृष्ट्या त्यावेळी अशक्य होते. ज्यावेळी इंडस्ट्री फिल्म तंत्रावरून डिजिटल तंत्राकडे पाऊल टाकत होती त्यावेळी फोटोग्राफरची सोय, सवयी लक्षात घेऊन लेन्सेस ची साईज मात्र तीच ठेवण्यात आली. फोटोग्राफर्स लोकांनी देखील 35mm वरील आपली निष्ठा आजतागायत अढळ ठेवली. जसजसे तंत्र विकसित होत गेले, फुल फ्रेम सेन्सर्स बनविणे तांत्रिक दृष्ट्या शक्य होत गेलं. पण त्यासाठी खर्च देखील बराच येतो. आणि ह्याच कारणामुळे फुल फ्रेम कॅमेऱ्यांची किंमत जास्त आहे.

फ्रेम साईज समजताना फोटोग्राफी ची एक कन्सेप्ट इमेज सर्कल समजणे आवश्यक आहे. आपले डोळे जे दृश्य बघतात, भौमितिक दृष्ट्या ते अंडाकृती आकारात असते. आपला मेंदू त्याचे तार्किक आकलन करून त्या दृष्यास एका पटलात बसतो. कॅमेरा ज्यावेळी इमेज घेतो तो लेन्सच्या गोलाकार आकारात डाटा घेतो. हा गोल म्हणजे इमेज सर्कल. मघाशी नमूद केल्याप्रमाणे आपला मेंदू हा एकाच पटलातील चौकोनी आकाराचे चित्र चटकन प्रोसेस करू शकतो म्हणून आपल्या दैनंदिन जीवनातल्या असंख्य गोष्टी (विशेषतः चित्रं, पेपर, वाह्या, पुस्तकं, डिजिटल स्क्रीन इत्यादी.) चौकोनी आहेत. आणि ह्याच कारणाने लेन्स ने कॅपचर केलेल्या गोलाकार इमेज डाटा ला सेन्सर वर चौकोनी बनवण्यात येते. लेन्सेसच फोकल लेंथ कॅलिबरेशन हे 35mm सेन्सर साईज हे मूळ एकक मानून केलेलं असतं. लेन्स सर्कलच्या वर्तुळात एक चौकोनी इमेज कट केली जाते की जेणेकरून कमीत कमी डाटा लॉस होईल. (सोबत दिलेल्या इमेज प्रमाणे). आणि क्रॉप सेंसरची साईज ही फुल फ्रेम पेक्षा 1.5 पटीने असल्या कारणाने हा सेन्सर वर्तुळाच्या परिघाला स्पर्श न करता आतली इमेज क्रॉप करून कॅपचर करतो. ह्या क्रॉप केलेली साईज मुळे ह्या सेन्सर्स ना क्रॉप सेन्सर म्हंटले जाते.

सध्या तंत्रज्ञान आणखी पुढे सरसावल आहे. मिड सेन्सर आणि लार्ज फॉरमॅट सेन्सर देखील बाजारात उपलब्ध आहे. लार्ज फॉरमॅट कॅमेऱ्यांची किंमत, आणि मुंबईत एका फ्लॅट ची किंमत आज तरी एकच आहे. पण जोवर फोटोग्राफर ची 35mm वर असलेली निष्ठा अतूट आहे तोपर्यंत तरी मोठ्या सेंसरच काही अप्रूप वाटण्याचं कारण नाही.
©सर्व हक्क Sharp Imaging अहदनगर कडे राखीव