fbpx

स्टार ट्रेल फोटो घेण्याची ट्रिक! 3

या फोटोला स्टारट्रेल फोटोग्राफी असं म्हणतात…पृथ्वी फिरली की त्यानुसार दिसणारे हे आकाशातील कॅमेरात टिपलेले असंख्य ग्रह तारे…

तर हा फोटो कसा काढतात? .. किंवा हा फोटो नेमका काय आहे याविषयी थोडी माहिती….

मी घेतलेला हा फोटो सिंगापूर पासून वीस किमी अंतरावर असलेल्या एका खेडेगावात घेतलाय…तिन्ही बाजूला डोंगर आणि त्याच्या बरोबर मध्यभागी एक अतिशय सुंदर असं रिसॉर्ट…रिसॉर्टला लागून असलेल्या एका छोट्याशा डोंगरावर रात्री हे फोटोशूट केलंय….

आता बघा पृथ्वी स्वतः भोवती २४ तासात एक प्रदक्षिणा करते आणि आपण पृथ्वीवर असल्याने आपणही हा प्रवास करतो पण आपल्याला तो सहज जाणवतं नाही…आपल्याला फक्त दिवस रात्र समजतं…पण आपण जेंव्हा बस, कार किंवा रेल्वे मधून प्रवास करतो त्यावेळी रस्त्याच्या कडेची झाडे किंवा घरे आपल्याला मागे मागे जाताना दिसतात… तसेच जेंव्हा आपण या पृथ्वीवर पृथ्वीच्या वेगाने प्रवास करतो तेंव्हा आपल्या या पृथ्वीच्या आजूबाजूला असणारे ग्रह तारे आपल्याला असेच उलट दिशेने पळताना दिसायला हवे …बरोबर की नाही?

पण उघड्या डोळ्यांनी सर्व सामान्य अवस्थेत हे आपल्याला दिसतं नाही पण ही प्रक्रिया घडतं असते…आणि हेच या फोटोग्राफ मध्ये दिसतं…

हा फोटो घेण्यासाठी शहरापासून खूप दूर लांब एखाद खूप अंधाराचं ठिकाणं शोधावं लागतं…त्यासाठी काही मोबाईल ऍप मदत करतात…अशा जागेचा शोध घेऊन त्याठिकाणी रात्री पोहोचायचं…शक्यतो हा दिवस अमावस्या किंवा तिच्या आगेमागे एखादा दिवस निवडावा लागतो…जेणे करून चंद्र नसल्याने आकाश अंधारमय असेल आणि त्यामुळे जास्तीत जास्त तारे दिसू शकतात…

रात्री दहाला जेवण वगैरे करून ठीकठाक अंधार झाला की मग कॅमेरा सेट करायला घ्यायचा….या फोटोसाठी काही विशिष्ट सेटिंग कॅमेरा मध्ये करावी लागते…या फोटोसाठी काही खास लेन्स आवश्यक असतात…या फोटोसाठी ट्रायपॉड जरुरी असतो…कॅमेरालेन्स ट्रायपॉडवर अशा पद्धतीने सेट करायचा त्याचे तोंड उत्तर दिशेला आणि ध्रुव ताऱ्यावर फोकस असेल…या फोटोत जो स्थिर मध्यभागी एकच तारा आहे तो आहे ध्रुव तारा…

आता आपली पृथ्वी ध्रुव ताऱ्याच्या सरळ रेषेत स्वतः भोवती फिरते…कॅमेरा चालू करायचा…आता आपण कुठलाही फोटो घेताना कसं बटन दाबलं की लगेच क्लिक होतं म्हणजे कॅमेराच्या आतलं शटर उघड होतं समोरच दृश्य टिपलं जातं आणि शटर बंद होतं, हे घडतं सेकंदाच्या काही भागात पण येथे तसं नाही…येथे बटण दाबलं की तीस सेकंद कॅमेराच शटर उघड राहतं आणि तीस सेकंदानंतर ते बंद होतं… हा तीस सेकंद वेळ कॅमेरात सेट करता येतो…त्याच्याहून जास्त वेळेचे सेटिंग कॅमेरात नसतं….बरं हे बटन दाबण्यासाठी कॅमेराला हात लावायचा नसतो …नाहीतर फोटो हलतो …हे बटन दाबण्यासाठी एक वेगळं शटर लॉक रिमोट असतो जो वायरने कॅमेराला जोडलेला असतो…आणि तो ऑटोलॉक केला की तो आपोआप दर तीस सेकंदाला शटर उघडतो आणि बंद करतो…थोडक्यात दर तीस सेकंदाला एक फोटो हा कॅमेरा घेतो…

आता या तीस सेकंदात आपली पृथ्वी थोडी पुढे गेलेली असते आणि प्रत्येक तीस सेकंदाला आकाशातले तारे टिपल्यामूळे त्यांची जागा बदलेली दिसते…

असे तीस सेकंदाचे जवळपास किमान 200 फोटो घ्यावे लागतात… जितके जास्त फोटो घ्याल तेवढे जास्त तारे दिसतात…कारण जसजसा वेळ जातो तसतशी आपली पृथ्वी फिरत जाते आणि त्या त्या वेळेचे तारे समोर येतात ज्याला आपण तो उगवला असं म्हणतो…जसं मध्यरात्री पहाटे उगवणारा शनी …किंवा उत्तर रात्री दिसणारा मंगळ… असे असंख्य लाखो छोटे मोठे तारे उगवतं असतात…एकदा का शटर लॉक केलं की कॅमेरा ते ऑटोमॅटिक टिपत असतो… त्यावेळी आपल्याला काही काम नसतं…

असे तीस सेकंदाचे समजा दोनशे फोटो घेतले की ते सगळे फोटो कॉम्प्युटरवर घ्यायचे आणि एका विशिष्ट सॉफ्टवेअरच्या साहाय्याने ते सर्व फोटो घेतलेल्या क्रमाने एकमेकांना जोडले की असा फोटो तयार होतो…जेवढे जास्त फोटो तेवढे मोठे सर्कल…(सोबतचा व्हिडीओ पहा)

आता यात खूप काही गोष्टी करता येतात…या फोटोत समजा समोर छोटेसे मंदिर असेल ( माझ्या फोटोत एक झाड आहे ) किंवा छान घर असेल किंवा एखादी मूर्ती असेल तर फोटोत जान येते…असाच फोटो समजा तळ्याच्याकाठी किंवा धरणाच्या समोर काढला की अजून खुलून येतो…

या फोटोसाठी आकाश अतिशय स्वच्छ हवे असते… म्हणजे अजिबात एक सुध्दा ढग नसायला हवा…आकाश निरभ्र हवे…प्रकाशाचे प्रदूषण बिलकुल नको…एवढा काळाकुट्ट अंधार हवा की आपल्याला आपलाच पाय दिसायला नको…बरं हे फोटो घेत असताना कॅमेरा समोर कुठलाही लाईट यायला नको…
माझ्या फोटोत बघा एक काजवा अगदी काही सेकंदासाठी कॅमेरा समोर येऊन गेला तरी तो टिपला गेला…पिवळ्या रंगाचे स्पॉट्स हे काजव्याचे आहेत…

हिमालयात किंवा युरोपियन देशात हे असले फोटो खूप छान येतात कारण तिथे आकाश तर स्वच्छ असतेच पण इतरही धूर आणि धुळीचे प्रदूषण कमी असल्याने प्रत्येक फोटो असा फुल ब्राऊट आणि खूप साऱ्या ताऱ्यांनी भरलेला येतो…

मी शूट केले ते ठिकाणं शहरापासून लांब असूनही येथे थोडं लाईटच प्रदूषण होतंच… फोटोच्या तळाशी डोंगराच्या कडेकडेने बघा पलीकडून येणारा प्रकाश थोडा थोडा दिसतोय…तेच नको असते…

मी घेतलेला हा एक सर्व साधारण फोटो आहे..यात खूप काही करता येईल…

तळटीप – हे वर नमूद केलेले ” सिंगापूर” हे महाराष्ट्रामधील एक गाव असून वेल्हेच्या जवळ आहे…

———

श्री. प्रशांत कुलकर्णी, पुणे यांच्या फेसबुक वॉल वरून साभार. (संपादित)

3 Comments

  1. Nice photography

    Suresh gavali

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

SHOPPING CART

close